Deen Dayal Sparsh Yojana: भारतीय पोस्ट विभागाने इयत्ता ६ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी एक खास शिष्यवृत्ती योजना प्रस्तावित केली आहे, जिचं नाव – ‘दीनदयाल स्पर्श योजना’ आहे. या योजनेअंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उत्तम आहे आणि ज्यांना टपाल तिकीटांचा संग्रह (फिलाटली – Philately) करण्याचा छंद आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
‘फिलाटली’ म्हणजे केवळ टपाल तिकीटांचं संकलन आणि अभ्यास नाही, तर तिकीटं आणि त्यासंबंधीच्या इतर वस्तूंचं महत्त्व जाणणं, त्यांचं कौतुक करणं आणि त्यावर संशोधन करणंही, यात समाविष्ट आहे. टपाल तिकीटं जमा करण्याच्या छंदात विशिष्ट विषयांवरील तिकीटं शोधणं, मिळवणं, व्यवस्थित लावणं, त्यांची नोंद करणं, प्रदर्शन भरवणं, जतन करणं आणि त्यांची काळजी घेणं सामील आहे. हा छंद केवळ मनोरंजक नाही, तर तो माहितीपूर्णही आहे.
टपाल तिकीटांचा संग्रह करणं हा एक शांत आणि आरामदायी अनुभव असू शकतो, जो जीवनातील तणाव कमी करतो. सोबतच, एक ध्येय मिळाल्यानं कंटाळाही दूर होतो. समान आवडीच्या लोकांमध्ये यामुळे मैत्री आणि सामाजिक संबंध वाढू शकतात. तिकीटांची नोंदणी आणि व्यवस्थापन करताना आपल्या स्मरणशक्ती आणि माहिती व्यवस्थापन कौशल्यांचा विकास होतो.
‘दीनदयाल स्पर्श’ शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश, लहान वयात विद्यार्थ्यांमध्ये फिलाटली या छंदाला प्रोत्साहन देणं आहे. हा छंद त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाला मदत करेल आणि त्यांना आरामदायक व तणावमुक्त जीवन जगण्यासही प्रेरित करेल.
भारतीय डाक विभाग दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये फिलाटलीच्या माध्यमातून टपाल तिकीटांविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी संग्रह करावा, यासाठी ही योजना चालवत आहे. यावर्षीच्या ‘दीनदयाल स्पर्श’ शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावे लागतील.
या योजनेचा महत्त्वाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पोस्ट विभागाबद्दल आपुलकीची भावना निर्माण व्हावी, हा आहे. या योजनेतून फिलाटली हा छंद म्हणून जोपासणाऱ्या भारतातील ९२० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपात दरवर्षी ६ हजार रुपये मिळतील.
योजनेची माहिती:
- संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांसाठी ९२० शिष्यवृत्त्या दिल्या जातील.
- प्रत्येक पोस्टल सर्कलमध्ये इयत्ता ६ वी, ७ वी, ८ वी आणि ९ वी च्या प्रत्येकी जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यांना, म्हणजेच एकूण ४० शिष्यवृत्त्या दिल्या जातील.
- मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ९ वी मध्ये नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दर तीन महिन्यांनी दिली जाईल.
- जे विद्यार्थी पात्रता निकष पूर्ण करतील आणि निवड प्रक्रियेत यशस्वी ठरतील, त्यांनाच शिष्यवृत्ती मिळेल.
- शिष्यवृत्तीची रक्कम दरवर्षी ६००० रुपये किंवा दरमहा ५०० रुपये असेल.
- शिष्यवृत्तीची निवड एका वर्षासाठी असेल. निवड झालेल्या विद्यार्थ्याने पुढील वर्षी अर्ज केल्यास आणि इतर निकष पूर्ण करत असल्यास, त्याला पुन्हा अर्ज करण्यास कोणताही प्रतिबंध नाही.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शाळेत, एका अनुभवी फिलाटेलिस्ट ची मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली जाईल. फिलाटली मार्गदर्शक, शाळेत फिलाटली क्लब सुरू करण्यास मदत करेल, तरुण आणि इच्छुक विद्यार्थ्यांना छंद कसा जोपासावा याबद्दल मार्गदर्शन करेल आणि त्यांच्या फिलाटली प्रकल्पांमध्ये मदत करेल.
पात्रता:
- अर्जदार हा भारतातील मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी असावा.
- संबंधित शाळेत फिलाटली क्लब असणे आणि विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे.
- ज्या शाळेत फिलाटली क्लब नसेल, अशा विद्यार्थ्यांचे स्वतःचे फिलाटली डिपॉझिट खाते विचारात घेतले जाऊ शकते.
- उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा. शिष्यवृत्तीसाठी निवड करताना, विद्यार्थ्याने मागील अंतिम परीक्षेत किमान ६०% गुण किंवा त्याच्या समकक्ष ग्रेड मिळवलेले असावेत. अनुसूचित जाती/जमातीसाठी ५% ची सूट असेल.
ह्या योजनेबद्द्ल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करा.
https://tinyurl.com/3sumvs3u